मराठी शाळा
आमच्या संरचित भाषा कार्यक्रमाद्वारे मराठी भाषा शिका आणि जतन करा

मराठी भाषेविषयी थोडेसे
अभिजात मराठी भाषा ही एक प्राचीन इंडो-आर्यन भाषा असून तिचा इतिहास साधारणत: १००० वर्षांहून अधिक जुना आहे. लेखन, साहित्य आणि भाषाशास्त्राच्या माध्यमातून मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि ती गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि इतर राज्यांतील मराठी भाषिक लोकांद्वारेही बोलली जाते. तसेच, भारताबाहेरही अनेक देशांमध्ये, विशेषतः अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच युरोप येथे स्थायिक असलेल्या मराठी समुदायाद्वारे अभिजात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
परदेशात मराठी भाषा – एक जपण्यासारखी ओळख
ऑस्ट्रियामध्ये स्थायिक झालेल्या पहिल्या पिढीतील मराठी भाषिकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते. मात्र दुसऱ्या पिढीतील मुलांना मराठी समजते आणि थोडक्यात संवाद साधता येतो, पण वाचन आणि लेखनाच्या बाबतीत मर्यादा जाणवू लागतात. पुढच्या पिढ्यांमध्ये मात्र मराठी भाषेचा संपर्कच पूर्णपणे तुटण्याची शक्यता असते. हे चित्र केवळ ऑस्ट्रियापुरते मर्यादित नाही; परदेशात वाढणाऱ्या मुलांचे दैनंदिन आयुष्य प्रामुख्याने इंग्रजी, जर्मन किंवा इतर स्थानिक भाषांमध्येच घडत असते. शाळा, मित्रपरिवार, प्रसारमाध्यमे आणि सार्वजनिक जीवन – सर्व काही मराठीपासून दूर जात असते. या परिस्थितीत मराठी भाषेशी नाळ कायम राखणे हे मोठे आव्हान बनते.
आमचा दृष्टिकोन (Vision)
मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचं, परंपरांचं आणि ओळखीचं प्रतीक आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते, आणि म्हणूनच 'मराठी शाळा ऑस्ट्रिया' या उपक्रमामार्फत ऑस्ट्रियामध्ये वाढणाऱ्या मराठी मुलांना मराठी शिकवण्याचा आणि जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवणारी, भाषेच्या माध्यमातून संस्कृतीची नाळ जपणारी आणि मराठी भाषेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा — हाच आमचा खरा प्रयत्न आहे.
आमचे ध्येय (Mission)
मराठी शाळा ऑस्ट्रियाच्या माध्यमातून आम्ही ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा ऑनलाईन वर्ग आयोजित केला जातो (वर्गांची सुरवात सप्टेंबर २०२५). बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (BMM) मराठी शाळेच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध, रचनात्मक आणि आनंददायी पद्धतीने मराठी भाषा वाचायला, लिहायला आणि बोलायला शिकवण्याचा आमचा संकल्प आहे. या शिक्षणप्रक्रियेतून मुलांमध्ये भाषेची आत्मीयता निर्माण व्हावी, त्यांचा मराठी संस्कृतीशी संबंध टिकून राहावा आणि मराठी भाषेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा — हाच आमचा खरा प्रयत्न आहे.
संपर्क
आपल्या पाल्याचे नाव मराठी शाळा ऑस्ट्रिया मध्ये नोंदवण्याची इच्छा असल्यास, कृपया आम्हाला खालील ईमेलवर संपर्क करा. तसेच जर आपल्या मनातही मराठी भाषेप्रती जिव्हाळा असेल आणि आपण आमच्या ध्येयाशी जोडलेले आहात असे वाटत असेल, तर शिक्षक किंवा स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया आम्हाला खालील ईमेलवर संपर्क करा.